कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा

Published by Me in Kunakeshwar Mahashivratri · 30 August 2020
Tags: Mahashivratri

कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा

(Mahashivratri celebrations at Kunakeshwar)

महाराष्ट्रात पंढरपूरच्या खालोखाल मोठी यात्रा जर कुठे भरत असेल तर कुणकेश्वरला. महाशिवरात्री यात्रे दरम्यान इथे ५ ते ६ लाख भाविक हजेरी लावतात. भक्तांची अलोट गर्दी, विविध वस्तूंचे स्टॉल्स, खरेदीसाठी सुरु असलेली ग्राहाकांची धडपड हा सगळा सरंजाम कधीतरी शक्य झाल्यास अनुभवावा असा असतो. ज्यांना गर्दीचा त्रास होतो त्यांनी या दरम्यान इथे येणे टाळावे.

एकदा तरी आवर्जून जावं असं कोकणातलं नितांत सुंदर आणि रम्य ठिकाण; कुणकेश्वर. इथली सुंदरता अनुभवायची असेल तर यात्रेचे दिवस सोडून इथे जाण्याचे ठरवावे. देवगड पासून २० किमी, आचरा पासून १८ किमी, मालवण पासून ३५ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण आज एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. सर्वच बाजूनी इथे पोहोचणारे रस्ते निसर्गरम्य परिसरातून प्रवास करतात. अगदी गाडी लावून मंदिर प्रांगणात पोहोचेपर्यंत मंदिराचे दर्शन होत नाही. परंतु एकदा का इथे पोहोचलो की तो अथांग पसरलेला समुद्र, स्वच्छ सुंदर समुद्र किनारा आपले लक्ष वेधून घेतो.

मंदिराची बांधणी, ते बांधण्या पाठीमागे असलेली आख्यायिका या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊनच अनुभवाव्यात अशा आहेत.



मी एकदाच यात्रेदरम्यान इथे गेलो होतो. हजारोंच्या संख्येने उभ्या असलेल्या गाड्या, कित्येक एसटी बसेस, रस्त्याच्या दुतर्फ़ा मांडलेली खेळण्याची, जीवनावश्यक वस्तूंची दुकान, अनेक खाद्यपदार्थ पुरवणारी छोटीमोठी हॉटेल्स आणि या सगळ्यांच्या मधून वाहणारा भाविकांचा लोंढा; हे एकदा बघायला ठीक आहे; पण माझ्यासारख्या निसर्ग आणि निवांतपणा आवडणाऱ्या व्यक्तीला सतत रुचणारं नाही.

राहण्या-जेवण्याची उत्कृष्ट सोय इथे उपलब्ध आहे. मस्त, चविष्ट शाकाहारी तसेच अस्सल कोकणी मांसाहारी जेवणाची लज्जत तुम्हाला इथे चाखता येईल.

या गावाशी माझी (आणि माझ्यासोबत कोल्हापुरातील अन्य मित्रांची) एक भावनिक नाळ गुंतलेली आहे. त्याबद्दल पुढच्या भागात लिहीन सविस्तर.

  

Open full article